असून नक्कीच अडचण नाही, परंतु नसून खोळंबा नक्कीच

असून नक्कीच अडचण नाही, परंतु नसून खोळंबा नक्कीच 

सध्या मी भारतात आहे. आणि एक वेगळाच पेच प्रसंग वाट्याला आला आहे. 

मला सकाळी वेगवेगळ्या सूचना मिळतात. एक दिवस मला अचानक आज्ञा सुटली, "विवेक गपचूप मांडी घालून सोफ्यावर १५ मिनिट बसून राहा. एकदा आज्ञा आली, की आता स्वयंपाकघरात पाऊल ठेऊ नकोस. मला तहान लागली होती ती मारून मी गुमान बसून राहिलो. चालू नकोस, इथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस, ही बाथरूम वापरू नकोस वगैरे वगैरे सूचना एकाच कारणामुळे असतात. त्या म्हणजे घरात येणाऱ्या बायका. 

माझ्या लक्षात आलं आहे की सकाळी उठल्यापासून दुपारी दोन पर्यंत घरातल्या सगळ्या गोष्टी या बायकांभोवती फिरतात. यात एखाद्या नेटवर्किंग सिस्टीम पेक्षा जास्ती रिडंडंन्सी असते. एक बाई आली नाही तर काय करायचं, एका बाईला उशीर झाला तर काय करायचं, कुठली बाई वेळेवर येते, कुठली नेहमी उशीर करते, उशीर केला तर ती कुठे असेल (त्यांना फोन करायचा, कारण बायकांकडे आपल्यापेक्षा उत्तम फोन असले तरी त्यांना कधी आणि कोणाचे फोन उचलावेत ते छान कळतं), बदली बाईचं तंत्र काय या सगळ्या गोष्टींची "रन बुकं" डोक्यात तयार असतात, आणि घोळत असतात. 

मी तर सकाळी उठल्यापासून २ वाजेपर्यंत प्रचंड टेन्शनमध्ये असतो. आज बायकांचं काय होईल! दोन वाजता शेवटची बाई येऊन गेली की, चला आता उद्या सकाळपर्यंत निश्चिती असा म्हणून सुटकेचा निश्वास टाकतो.  


Comments

Popular posts from this blog

शब्द बापुडे केवळ वारा

टाळ्या आणि टाळ्या (हशा मात्र मनातल्या मनात)

न केलेल्या रिक्षा (सहज सुचलं म्हणून)