न केलेल्या रिक्षा (सहज सुचलं म्हणून)

लहानपणी पुण्याला जाणं, सुट्टीत, हे शाळेत असताना कॉमन होतं. आणि गेलो की सगळ्यात जास्ती सुमती मावशी, अर्थातच कारण म्हणजे बंडा/किरण. ज्योती/अनघा त्या मानाने लहान. अनुपमा आमच्याच वयाची. क्वचित कधीतरी चिंचवड, पण तिथे जाणं म्हणजे मोठा प्रवास होता. शिवाजीनगर बस स्टॅण्डवर जा, वाट बघा, मग एक पी एम टी ची बस येणार, मजल दरमजल करत पोचणार, आणि मग डुकरांना चुकवत तारा मावशीकडे. आता ते वाडे गेले, चिंचवडचं खेड्याचं रूप गेलं, डुकरं नाहीशी झाली.  असो. 

तर पुण्याला गेलो की सगळ्या मावश्या इथे-तिथे रिक्षा करून जायच्या. आमची आई एकदम उस्ताद या बाबतीत. पण बाकी मावश्या पण काही कमी नव्हत्या. 

मी आणि किरण मात्र मैलोन मैल चालत फिरायचो. तसं बघितलं तर आता, अमेरीकेतली अंतरं बघितली तर पुण्यातली छोटी वाटतील, पण तेव्हा तसं वाटायचं नाही. मी आणि किरण, आणि क्वचित बंडा. आम्ही सुमती मावशीच्या घरून निघून शनिवार वाडा, पर्वती, बहुधा बिबवे वाडी वगैरे चालत फिरायचो. चालणं हे सुख नक्कीच होतं. तेव्हा पुण्यात इतकं प्रदूषण नव्हतं. ठाण्याच्या मानाने हवा चांगलीच थंड असायची. त्यामुळे कुठेही मी आणि किरण असलो तर आम्ही रिक्षा करायचो नाही.  

निघताना आईच्या हाताचं प्रवासी पिठलं हे व्हायचंच, कारण बंडा/किरणला ते आवडायचं. पुणे ठाणे हा साडेचार ते पाच तासांचा यष्टीचा प्रवास! तो नको वाटायचा. नाना साहेब स्वतः कधी कधी पुष्कळ वेळ घालवून गोडाचा शिरा करायचे. श्रीखंड करायचे. खूप वर्षांपूर्वी किरणकडे गेलो होतो, सॅन डिएगो ला, तेव्हा किरणनी श्रीखंड केलं होतं. मला तरी थेट नाना साहेबांची आठवण आली. 

असो, या सर्व आमच्या न केलेल्या रिक्षा.  

Comments

Popular posts from this blog

शब्द बापुडे केवळ वारा

टाळ्या आणि टाळ्या (हशा मात्र मनातल्या मनात)