A letter from Abdul Karin Khan Saheb

 केतकर यांना आशीर्वाद (बळवंतराव केतकर)

आपले पत्र पावले. मजकूर समाजला.  आपण मला फोटो मागितला होता. परंतु माझ्याजवळ एकही शिल्लक नाही, करिता आपल्याला फोटो पाहिजे असेल तर तो रंगराव मामा घोसपुरकर, यांच्याकडे मिळेल. त्यांचा पत्ता, ' रंगराव मामा घोसपुरकर, फोटोग्राफर स्टेशनजवळ, धारवाड ता. क.'

रहिमत खांसाहेबांची व माझी माहिती खाली देत आहे. 

रहिमतखां हे दिल्लीजवळ बाराबस्ती म्हणून बारा गावे आहेत. ती पठाण लोकांची आहेत. त्यांमधे हुसेनपुर नावाचे एक गाव आहे. तेथील ते रहिवासी होत. त्यांच्या आजोबांचे नाव शक्कर मखन खान व त्यांच्या पणजोबांचे नाव नथ्थन पीरबक्ष व त्यांच्या वडिलांचे नाव हद्दु हस्सू खान. त्याला आपण कुरुक्षेत्र म्हणतो त्या शहराचे नाव किराणा असे आहे. म्हणजे ते कर्ण या राजाचे होते. हुसेनपूर आणि किराणा यामध्ये वीस मैलाचे अंतर आहे. किराणा येथील मी राहणारा आहे. व खांसाहेब बंदेअलीखान हे बीनकर होऊन गेले तेही किराणा येथील राहणारे होते. बंदेअलीखान आणि आमचे नाते त्यांच्या पणजोबांपासून आहे. आमच्या पणजोबांचे नाव हिंगारंग म्हणून आहे. व त्यांनी बांधलेले ख्याल, धृपद, अस्ताई, धमार हे सर्व माझ्याजवळ आहेत. माझ्या आजोबांचे नाव वाज्यद अली खान व त्यांच्या बंधूंचे नाव शाहाबखान.  शाहाबखान हे राजा चंदुलाल यांच्या कारकीर्दीत हैदराबादेत नोकर होते. व माझ्या वडिलांचे नाव कालेखां व काकांचे नाव अब्दुल्लाखान व चुलत काकांचे नाव नन्नेखान. त्याप्रमाणे बंदेअलीखान हेही माझे चुलत चुलते.  बंदेअलीखान व नन्नेखान यांचे शिक्षण एका ठिकाणी झाले. 

रहिमतखान साहेबांचा व माझा संबंध मी लिहीत आहे.

खांसाहेब रहिमतखान यांची बहीण खांसाहेब बंदेअलीखान यांना दिली होती. हद्दुहसुखान यांचे चुलतभाऊ नत्थूखान व मसीतखान व मसीतखान यांची मुलगी आमची आई. 

जी वरील हकीकत मी दिली आहे ती सर्व खरी आहे. कोणी जर त्याबद्दल शंका घेईल तर त्याला मजकडे पाठवावे. 

खांसाहेब बंदेअलीखान यांच्या भावाचे नाव खादाम हुसेन खान व त्यांच्या वडिलांचे नाव मियाँ गुलामत खान व त्यांच्या आजोबांचे नाव गुलाम मौला. त्यांच्याही चीजा बांधलेल्या आहेत. व त्यांनी चिजेमध्ये "सबरस" हे नाव घातलेले आहे. "सबरस" व "हिंगारंग" हे सक्खे बंधू होत. बहिराम खांसाहेब या नावाचे गवई जयपूर स्टेट मध्ये होते. ते आंबेटा येथील रहिवासी होत. आंबेटा हे गाव माझ्या गावाजवळच आहे. त्यांची बहीण ही बंदेअलीखान यांची आई होय. बहिरामखान यांचे नातवांना खांसाहेब बंदेअलीखान यांच्या दोन मुली दिल्या होत्या. त्यांच्या नवऱ्यांची नावे अल्लाबंदे व जाकरूद्दीन खान. त्यांची दोन मुले हल्ली जिवंत आहेत. त्यातील एकजण इंदूरला आहे. त्याचे नाव नशिरुद्दीन खान व दुसरे अलवार स्टेट मध्ये आहेत त्यांचे नाव जहानुद्दीन खान आहे. येवढी माहिती मला आहे. ही सर्व खरी आहे ह्याबद्दल काहीएक शंका नाही. 

माझ्या भावांची नावे - मी मोठा, अब्दुल करीम खान व माझ्यापेक्षा धाकटा अब्दुल लतीफ खान व सर्वात धाकटा अब्दुल हक. अब्दुल हक यांना तुम्ही पाहिले असेल. ते आता मयत आहेत. माझे चुलत चुलते नन्नेखान यांना एक मुलगा होता. तो आता मयत आहे. त्याचे नाव रहिमबक्ष. तेही हैदराबादेत नोकर होते. माझे शिक्षण माझे चुलत चुलते नन्नेखान यांच्याजवळ झाले. हे आशीर्वाद 

आपला 

प्रो. अब्दुल करीम खांसाहेब गवई मिरज 


Comments

Popular posts from this blog

शब्द बापुडे केवळ वारा

टाळ्या आणि टाळ्या (हशा मात्र मनातल्या मनात)

न केलेल्या रिक्षा (सहज सुचलं म्हणून)